हंडी निमगाव येथील विहिरीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली, अमोल राजगुरु असल्याचे स्पष्ट.
नेवासा: पडीक शेतातील विहिरीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली, अमोल राजगुरु असल्याचे स्पष्ट.
अहिल्यानगर, 23 जानेवारी 2025: नेवासा तालुक्यातील हंडिनिंमगाव शिवारातील एका पडीक शेतात असलेल्या विहिरीत अज्ञात अवस्थेतील प्रेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
या घटनेची नोंद नेवासा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, प्रेताची ओळख अमोल बाबासाहेब राजगुरु (वय 35, रा. साकेगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांच्याप्रमाणे झाली आहे.
या घटनेची नोंद नेवासा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, प्रेताची ओळख अमोल बाबासाहेब राजगुरु (वय 35, रा. साकेगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांच्याप्रमाणे झाली आहे.
प्रकाश सुधाकर दळवी (वय 42, व्यवसाय मजूरी, रा. देडगांव, ता. नेवासा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अमोल बाबासाहेब राजगुरु हा त्यांचा मेहुणा होता.
अमोल याचे सासरवाडी सुरेशनगर (ता. नेवासा) येथे आहे.
दि. 5 जानेवारी 2025 रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास अमोल दारूच्या नशेत घरी आला आणि कुटुंबीयांसोबत वाद घालून घरातून निघून गेला. त्यानंतर तो परत घरी न आल्याने त्याची पत्नी ज्योती अमोल राजगुरु व कुटुंबीयांनी नेवासा पोलीस ठाण्यात मिसिंग रिपोर्ट(क्र. 04/2025) नोंदवला होता.
दि. 23 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता प्रकाश दळवी यांना फोनद्वारे माहिती मिळाली की, हंडिनिंमगाव शिवारातील एका पडीक शेतातील विहिरीत प्रेत दिसत आहे. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता विहिरीत लाल रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट घातलेल्या व्यक्तीचे पूर्णतः विघटित प्रेत आढळले. प्रेताला स्थानिकांच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढल्यानंतर प्रकाश दळवी व इतर नातेवाईकांनी प्रेताची ओळख पटवली. हे प्रेत अमोल बाबासाहेब राजगुरु यांचे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राथमिक तपासात मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने मृत्यू कधी आणि कसा झाला याबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही. मात्र, अमोल यांनी दि. 5 जानेवारी रोजी घर सोडल्यानंतर विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नेवासा पोलीस ठाण्याचे पो.ना.संजय माने यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेची नोंद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 194 अन्वये करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
प्रेताची ओळख पटवणाऱ्या नातेवाईकांमध्ये रावसाहेब राधू पटारे (वय 50, रा. साकेगाव), विशाल बाबासाहेब पटारे (वय 22, रा. साकेगाव), विलास शालमल पटारे (वय 42, रा. साकेगाव), दयानंद मनाजी पटारे (वय 38, रा. साकेगाव) यांचा समावेश आहे.
नेवासा पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. अमोल यांचा मृत्यू हा अपघाती होता की इतर कोणत्याही कारणांमुळे झाला आहे, हे स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. तसेच, अमोल राजगुरु यांच्या बेपत्ता झाल्या नंतरच्या हालचालींचा बारकाईने पोलिसांकडून मागोवा घेतला जात आहे.
नेवासा पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, सखोल तपासाद्वारे मृत्यूचे कारण शोधले जाईल. असे नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा