श्रीरामपुर शहरात धर्माचं विखारी राज'कारण जोमात...!

#भीमजन्मोत्सव 
 श्रीरामपुर शहरात धर्माचं विखारी राज'कारण जोमात असल्याच्या पार्श्वभूमीवर मोठी अस्वस्थता पसरलेली होती. राम'रहीमोत्सव  धार्मिक राष्ट्रीय एकात्मतेची देशभर ओळख असलेले सय्यदबाबा उरूस आणि रामनवमी यात्रे दरम्यान झालेला ऱ्हाडा हा इथल्या स्थानिक सर्वसामान्य जनतेला प्रचंड अस्वस्थ करून गेला. वातावरणात मोठी दहशत पसरलेली होती. रामायण या ग्रंथात उल्लेखलेल्या अयोध्यावासी रामचंद्र तथा श्रीराम यांच्या जन्माची आठवण म्हणून रामनवमी यात्रा सुरू करण्यात आली होती. हिंदू न् मुस्लिम असा कोणताही धर्मभेद इथं या उत्सवा दरम्यान कधीच अनुभवायला मिळाला नाही. शोभायात्रा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. 
        यंदा गोंधवणी भागातून शहरातील श्रीराम मंदिराच्या दिशेनं झेंडा मिरवणूक सुरू असताना याच मिरवणुकीत अयोध्यावासी श्रीरामांच्या त्या कालखंडा शी काही एक कालसाधर्म्य नसणारे मराठी मुलखातील आपल्या स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या सरदार अफजलखानाला चारी मुंड्या चित करीत असतानाचे कल्पनाचित्र काही उत्साही भक्तांकडून हातात धरून नाचवले गेले म्हणून दगडफेक केली गेली अशी चर्चा पांगली. सुसज्ज पोलिस यंत्रणेनं तेथे वेळीच कर्तव्य कठोर हस्तक्षेप करून संभाव्य धार्मिक तेढीचा तो बाका प्रसंग रोखला. या घटनेनं शहरात कलुशीत असं वातावरण तयार झालं होतं. पोलिस यंत्रणेची या प्रसंगांकडे आणि शहरातील वाढत्या बेलगाम बाल गुन्हेगारीकडे आता बघ्याचीच भूमिका आहे अशा आशयाच्या बातम्या माध्यमातून प्रसिद्ध झाल्या. स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते,राजकारण्यांसहीत जनतादेखील  हाच तर सूर आळवीत होती. 
     १४ एप्रिल हा भीमजन्माचा उत्सव.सायंकाळी निघणाऱ्या हजारो भीमानुयांच्या उस्फुर्त सहभाग चैतन्य उत्साहान भारलेल्या मिरवणुका लक्षवेधीच ठरतात. यंदा एक वेगळाच प्रयोग करायचे आम्ही निश्चित केले होते.प्रशासनाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवून शहरातील मेनरोडस्थित गांधी पुतळ्यासमोर छोटेखानी मंच उभारला. स्क्रीनवर भारतरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जीवनातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शित करण्यात आली. मोठ्या गर्दीमुळे महत्वाच्या या रस्त्यावर होत असलेली वाहतूक कोंडी नियंत्रण करण्यास मदत करण्यात आली.मिरवणुकीमध्ये सामील उत्साही हजारोंच्या संख्येतील सर्व महिला पुरुष बालक भीमानुयायांसोबत राष्टीय सद्भावना, राष्ट्राचे ऐक्य, बंधुता, एकात्मतेचा संदेश देणाऱ्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिकपणे वाचन करण्यात आलं. मिरवणुकांचं जबाबदारीनं नेतृत्व अन् संयोजन करणाऱ्या सर्व संयोजकांच  भारतीय संविधानाच्या प्रास्तविकेची प्रतिमा भेट स्वरूप देऊन सर्वांना गौरविण्यात आलं.याप्रसंगी  जय भीम च्या उस्फुर्त जयघोषाने संपूर्ण परिसर पार दणाणून,भारावून गेला होता. जणू भीममय झाला होता.
        भिमजयंतीच्या मिरवणुका या कुठेही काही गालबोट न लागता शांततेत आनंदाने पार पडाव्या  या हेतूने हे सारं नियोजन विचारपूर्वकच करण्यात आलं होतं. कर्तव्यावर असलेले  उपविभागीय पोलीस अधिकारी आयु. जयदत्त भवर यांनी या उपक्रमाचं निरीक्षण करून कौतुक केलं सोबत गौरवोद्गारदेखील काढले. पोलिस यंत्रणेला त्यांचं कर्तव्य पार  पाडण्यात मोलाचं सहकार्य दिलंय असं सांगून संयोजकांचे आभारदेखील मानले.  मिरवणुकीदरम्यान डोळ्यांत तेल घालून कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीसांतील माणसांचा प्रातिनिधिक सन्मान करताना आयु. जयदत्त भवर यांना भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रतिमा भेट केली तेव्हा मोठ्या आनंदाने स्वीकार झाला.
     या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमात राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष आयु. दिपकभाऊ निकाळजे गटाचे अहिल्यानगर युवा जिल्हाध्यक्ष आयु.रॉकी लोंढे यांच्यासह श्रीरामपूर तालुकाध्यक्ष श्रीकांत म्हंकाळे, शहराध्यक्ष आयु . शुभम शेळके,सामाजिक कार्यकर्ते आयु.गणेश गायकवाड, आयु.संदिप शर्मा,आयु.परवेज पठाण आयु.चंद्रकांत बनसोडे, आयु.जफर शेख, आयु. जमील खान, आयु. विकि लोंढे यांचा समावेश होता.आयु.राजाभाऊ कापसे,आयु.विकी कापसे यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. अगदीच ऐनवेळी सोपवलेली जबाबदारी मोठ्या निष्ठेनं पार पाडण्यात मित्र आयु निलेश बागुल व आयु. दिपक शेळके यांनी कुठलीच कसर ठेवली नाही.
      आम्ही स्वीकारलेली या सामाजिक उपक्रमाचं व्यवस्थापन, प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन,आणि सूत्रसंचालन ही जबाबदारी निष्ठेनं पार पाडली.या उपक्रमात जे कुणी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागी होऊन आमच्या विचारांसोबत सक्रीय राहिलेत, बळ दिलं अशा सर्वांचेच पत्रकार सुनिल किशोर शिरसाठ यांनी जाहीर आभार मानले..!  
 🌷#सुनील किशोर शिरसाठ.

टिप्पण्या